आंदोलनाचा दणका अन् आमदारांचा सज्जड दम; अखेर रस्ता दुरुस्तीला मुहूर्त
वसमत (प्रतिनिधी ) :
वसमत येथील राष्ट्रीय महामार्ग वरील दादरा ते कॅनल रोड तसेच गरीब नवाज हॉटेल पासून ते आसेगाव कॉर्नर पर्यंत झालेल्या रस्त्याची दुरावस्था व जागोजागी पडलेले खड्डे यासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा आंदोलनाच्या पवित्रा घेतलेल्या पत्रकार प्रशांत लोखंडे यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे
झोपेतून जागे झालेल्या बांधकाम विभागाला व या रस्त्याचे पालकत्व घेतलेल्या माहेरा या कंपनीला आमदार राजू भैया नवघरे यांनी सुद्धा नागरिकांच्या या सतत होणाऱ्या मागणीला व त्रासाला दाद देऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या होत्या
शेवटी अखेर सदरील अधिकाऱ्यांना याची प्रचिती येऊन जागोजागी पडलेले खड्डे बुजवण्यात आले व डांबरीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले
**वर्षभराच्या संघर्षाला यश: वसमतमधील मुख्य रस्ता झाला खड्डेमुक्त**
गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक पत्रकार प्रशांत लोखंडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि लढ्यामुळे वसमत रेल्वे उड्डाणपूल ते कॅनॉल या मार्गाचे डांबरीकरण पूर्ण झाले असून, रस्ता खड्डेमुक्त झाला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पत्रकार लोखंडे यांनी लोकशाही मार्गाने एक वर्षाचा प्रदीर्घ लढा दिला. यामध्ये प्रशासकीय गोंधळ, प्रबोधनात्मक आंदोलने आणि त्यानंतर पुकारलेले आमरण उपोषण अशा टप्प्यांचा समावेश होता. उपोषणाच्या घोषणेनंतर प्रशासनाने आणि संबंधित ‘माहेरा’ कंपनीने तातडीने दखल घेतली.
या कामांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या बाजूला असलेला मोठा खड्डा आणि गरीब नवाज परिसरातील खड्डे डांबरीकरण करून व्यवस्थित बुजवण्यात आले आहेत. वर्षभराच्या अथक संघर्षानंतर रस्ता सुस्थितीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शेवटी गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला प्रत्येक वेळेस आंदोलनाची भाषा समजते का हे मात्र वेळोवेळी स्पष्ट झाले आहे
