दसरा प्रदर्शनात मोफत पाळण्याचा आनंद घेणाऱ्या ‘व्हीआयपी’ वृत्तीवर व्यापाऱ्यांची नाराजी
वसमत | तालुका प्रतिनिधी
वसमत येथे सुरू असलेल्या सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारच्या आकाशपाळण्यांसह मनोरंजनाची अनेक साधने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.मात्र,या प्रदर्शनीत काही सधन नागरीक हे आपल्या प्रशासकीय,राजकीय विविध प्रकारची ओळखपत्रे दाखवुन मोफत खेळांचा आनंद घेत असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे,दुष्काळसदृश परिस्थिती आणि आर्थिक अडचणींमुळे प्रदर्शनीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असुन, अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वसमतच्या दसरा प्रदर्शनीमध्ये दरवर्षी विविध जिल्ह्यांतुन व्यापारी आणि व्यावसायिक मनोरंजनाची साधने घेऊन येतात.यासाठी ते वाहतुक, साहित्य,मनुष्यबळ आणि इतर बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. लाखो रुपयांची गुंतवणूक करून हे व्यापारी वसमतकरांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे आकाशपाळणे आणि खेळ उपलब्ध करून देतात. मात्र,यंदा प्रदर्शनीला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने व्यापाऱ्यांसमोर आर्थिक आव्हान उभे राहिल्याचे सांगितले जात आहे.
प्रदर्शनीमध्ये काही प्रशासकीय कर्मचारी,राजकीय पदाधिकारी आणि इतर व्यक्ती स्वतःची विविध प्रकारची ओळखपत्रे दाखवुन आकाशपाळण्यांसह मनोरंजनाच्या खेळांमध्ये मोफत प्रवेश मिळविण्याचा आग्रह धरत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी यावरून संबंधित कर्मचारी,पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये वादावादी होत असल्याचेही सांगितले जात आहे.
सामान्य नागरिक मनोरंजनाच्या साधनांचा आनंद घेण्यासाठी पैसे मोजत असताना,केवळ पदाचा किंवा ओळखपत्राचा आधार घेऊन मोफत सुविधा मिळविण्याचा प्रयत्न होत असेल,तर हा प्रकार कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित व्यक्तींना मोफत प्रवेशाची अधिकृत परवानगी आहे का,तसेच त्यासाठी प्रशासनाकडुन काही नियम निश्चित करण्यात आले आहेत का, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे.
दसरा प्रदर्शनीमध्ये सहभागी होणारे व्यापारी हे वसमत शहराबाहेरून मोठा खर्च करून येतात.प्रदर्शनीतील खेळांसाठी नागरिकांकडुन मिळणाऱ्या शुल्कावरच त्यांच्या व्यवसायाचे आर्थिक गणित अवलंबुन असते.अशा परिस्थितीत,ओळखपत्रांचा वापर करून मोफत सुविधांचा लाभ घेण्याचा प्रकार घडत असल्यास त्याचा थेट परिणाम व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो.
या प्रकाराबाबत काही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. बाहेरून आलेले व्यापारी वसमतच्या नागरिकांना मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करतात.अशा वेळी त्यांच्या व्यवसायाचा आणि आर्थिक हिताचा विचार न करता मोफत सुविधांसाठी आग्रह धरणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासकीय कर्मचारी असोत किंवा राजकीय पदाधिकारी, प्रत्येकाने आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि जबाबदारी लक्षात घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पदाचा वापर समाजहितासाठी व्हावा,अशी नागरिकांची अपेक्षा असते.मात्र,पदाचा किंवा ओळखपत्राचा प्रभाव वापरून वैयक्तिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न होत असल्यास अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे.
दसरा प्रदर्शनी ही केवळ मनोरंजनाची जागा नसुन, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि बाहेरील व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. त्यामुळे प्रदर्शनीमध्ये सर्वांसाठी समान नियम असावेत,व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास होऊ नये आणि कोणालाही अनधिकृतपणे मोफत सुविधा मिळु नयेत,यासाठी संबंधित आयोजक व प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
दरम्यान,ओळखपत्रांच्या आधारे मोफत प्रवेश देण्याबाबत आयोजकांचे नेमके नियम काय आहेत, याची अधिकृत माहिती समोर येणे गरजेचे आहे.संबंधित आरोपांची वस्तुस्थिती तपासुन प्रशासनाने योग्य ती स्पष्टता द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
