जवानांच्या हातावर सजणार ‘लिटल किंग्ज’च्या चिमुकल्यांची ‘स्नेहाची राखी’
१००० राख्यांतून सैनिकांप्रती कृतज्ञता; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शाळा परिसर दुमदुमला
वसमत (प्रतिनिधी ):
देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसमत येथील लिटल किंग्स इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय वसमत च्या विद्यार्थ्यांनी तब्बल १००० राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या. विद्यार्थ्यांच्या हातून सैनिकांसाठी पाठविण्यात आलेल्या या राख्या म्हणजे केवळ रेशमी धागे नसून, त्यामध्ये देशाच्या रक्षणकर्त्यांविषयी असलेला आदर, प्रेम आणि भावनिक नात्याची वीण गुंफलेली आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या विविध सीमांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांमुळे आपण आपल्या घरात आणि कुटुंबासोबत सुरक्षितपणे सण-उत्सव साजरे करू शकतो, ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थिनींनी सैनिकांना आपले भाऊ मानत अत्यंत प्रेमाने राख्या तयार केल्या. अनेक विद्यार्थिनींनी राख्यांसोबत जवानांसाठी भावनिक पत्रे आणि शुभेच्छा संदेशही लिहिले. “आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष राखी बांधू शकत नसलो, तरी आमची राखी सीमेवर तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि देशाच्या प्रत्येक बहिणीचे प्रेम तुमच्या सोबत आहे, ही भावना तुम्हाला जाणवावी,” असा भाव विद्यार्थिनींच्या पत्रांतून व्यक्त झाला.
राख्या पाठविताना शाळेतील वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ आणि ‘भारतीय जवानांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दणाणून गेला.
देशाच्या सीमेवर कडाक्याची थंडी, प्रखर ऊन, पाऊस आणि अनेक संकटांचा सामना करत जवान देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात. स्वतःच्या कुटुंबापासून आणि बहिणींपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या या सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी घरची उणीव भासू नये, यासाठी लिटल किंग्सच्या विद्यार्थ्यांनी हा भावनिक उपक्रम राबविला.
शालेय शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजविणारे असावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सीमेवरील जवान देशाचे रक्षण करतात आणि लिटल किंग्सच्या विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या या १००० राख्या त्यांच्यापर्यंत देशातील लहान बहिणींचे प्रेम आणि कृतज्ञता घेऊन जात आहेत. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठीही आयुष्यभर स्मरणात राहणारा देशभक्तीचा संस्कार ठरला.
> “देशाच्या सीमेवर स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून सैनिक आपल्या भारतमातेचे आणि आपल्या सर्वांचे रक्षण करतात. त्यामुळे प्रत्येक जवान हा आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य आहे, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजली पाहिजे. मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या १००० राख्या जवानांना पाठविणे हा केवळ रक्षाबंधनाचा उपक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, कृतज्ञता आणि सैनिकांप्रती सन्मानाचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न आहे. या छोट्याशा राखीच्या धाग्यातून सीमेवरील जवानांपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांचे प्रेम, आदर आणि ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे’ हा विश्वास पोहोचावा, हीच आमची भावना आहे.”
— प्रा. डॉ. नामदेव दळवी, संस्थापक, लिटल किंग्स इंग्लिश स्कूल
