वसमतकरांची संगीत महोत्सवाला भरभरून दाद; सुरांच्या मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध!
नागेश आडगावकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध; सानिका शिंदे यांच्या भरतनाट्यमने वेधले लक्ष
वसमत :
वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान व नगर परिषद, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी संगीत महोत्सवा’तील सुरेल संगीत मैफिलीस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरमणी प्रा. दत्ता चौगुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत गायक श्री. नागेश आडगावकर यांच्या अप्रतिम गायनाने उपस्थित रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सुरमणी प्रा. दत्ता चौगुले यांच्या नात कु. सानिका शिंदे यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचे. आपल्या नृत्यातून भाव, ताल आणि लय यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी सादर केलेल्या भरतनाट्यमने रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या संगीत मैफिलीत भक्तिगीते, भावगीते आणि संगीताच्या विविध रंगांची सुरेल अनुभूती रसिकांना मिळाली. नागेश आडगावकर यांच्या दमदार आणि भावपूर्ण गायनाने सभागृहातील वातावरण संगीतमय झाले. कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास वसमतच्या नगराध्यक्ष सौ. सुनिता मनमोहन बाहेती, उपनगराध्यक्ष श्री. राजकुमार एंगडे, माजी नगराध्यक्ष श्री. अब्दुल हफिज अब्दुल रहमान, श्री. दिलीप शिंदे, सौ. रूपलक्ष्मी चौगुले, नगरसेवक सचिन दगडू, आतिश दांडेगावकर, शिवहार डांगे, श्रीमती चारूदत्ता चौगुले, काशिनाथ भोसले, विजय कडतन, धनंजय गोरे, कन्हैया बाहेती यांच्यासह शहरातील मान्यवर, संगीतप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्म सोहळ्याच्या आरतीचे यजमान म्हणून श्री. भारत व सौ. दीपा नामपल्ली तसेच श्री. दिलीप शिंदे व सौ. रूपलक्ष्मी शिंदे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे वसमतचा सांस्कृतिक वारसा व परंपरा विशद करणारे प्रास्ताविक श्री. सुनील कबाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. प्रकाश इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. आनंद बडवणे यांनी केले. या संपूर्ण सांगीतिक मैफिलीचे निवेदन श्री. लक्ष्मीकांत जोशी धानोरकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा. पंजाब अंभोरे, सुनील कबाडे, प्रकाश इंगळे, आनंद बडवणे, लक्ष्मीकांत जोशी धानोरकर, आदित्य देशपांडे, मनोज चव्हाण, वसंत चेपूरवार, जयश्री पाटील व साक्षी जोशी यांनी विशेष पुढाकार घेतला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने संगीत, भक्ती आणि नृत्याचा सुरेख संगम घडवून आणणाऱ्या या संगीत महोत्सवामुळे वसमतच्या सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वसमतची सांस्कृतिक परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी रसिकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपत नव्या पिढीतील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
