भूखंड विक्रीविरोधात नागरिकांचा एल्गार; बेमुदत लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात.
भू-माफिया, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, सर्व्हे नं. १८० मधील व्यवहारांची एसआयटी चौकशीची मागणी
वसमत (प्रतिनिधी):
वसमत नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक १८० मधील भूखंडांच्या कथित बेकायदेशीर मालकी नोंद व खरेदी-विक्री प्रकरणाची चौकशी करून संबंधित भू-माफिया तसेच या प्रकरणात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत लक्षवेधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हे क्रमांक १८० मधील म्यु. घर क्रमांक A 505/4 व A 505/5 या प्रत्येकी १३५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मिळकती नगरपरिषदेच्या मालकीच्या आहेत. या दोन्ही मिळकतींच्या रिव्हिजन नक्कलीमध्ये २०१९ मध्ये खासगी व्यक्तींची नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या माहितीनुसार, घर क्रमांक A 505/4 ही मालमत्ता शेख एजाज शेख दादामिया यांनी २३ जुलै २०२४ रोजी देवानंद बाबाराव साबळे यांना ११ लाख ७ हजार रुपयांना विक्री केली. तसेच A 505/5 ही मालमत्ता संतोष जगदीश नागेश्वर यांनी २६ जुलै २०२४ रोजी मंगेश नंदकिशोर पारवेकर यांना ११ लाख ७ हजार रुपयांना विक्री केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर या व्यवहारांशी संबंधित पुढील खरेदी-विक्री व्यवहाराबाबतही आंदोलनकर्त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रिव्हिजन नक्कल हा मालकी हक्काचा अंतिम पुरावा नसताना संबंधित मालमत्तांचे खरेदी-विक्री दस्त नोंदणी करण्यात आल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दस्त क्रमांक ३२६३/२०२४, ३३३९/२०२४ व २५८०/२०२६ या व्यवहारांची चौकशी करून ते रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात नगरपरिषदेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी, दस्त नोंदणी करणारे दुय्यम निबंधक अधिकारी तसेच पोलिसांत दाखल प्रकरणातील संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच सर्व्हे क्रमांक १८० व त्याच्या सर्व पोटहिस्सा जमिनीवरील मागील दस्त नोंदणी, महसुली रेकॉर्डमधील बदल, नामांतर व फेरफार यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या असून, संबंधित भूखंड सील करून कथित खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करावी, संबंधितांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करावी, रेकॉर्डमध्ये कथित बदल करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच प्रकरणातील संशयितांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, प्रशासनाने आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे व पत्रकार मुनीरोद्दीन फारुखी यांनी दिला आहे. यामध्ये हलगी वाजवणे, थाळीनाद, ढोल-ताशा, बोंबाबोंब, भजन-कीर्तन तसेच तिरडी आंदोलन अशा विविध स्वरूपाच्या आंदोलनांचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी केलेले आरोप व मागण्यांबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा इतर संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
