पत्रकार व वृत्तपत्र उद्योगाच्या मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
वसमत येथे एक दिवसीय धरणे आंदोलन.
वसमत
प्रतिनिधी
राज्यातील पत्रकार व वृत्तपत्र उद्योगावर वाढत्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, वीज व मनुष्यबळ खर्चामध्ये सुमारे 150 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा मुद्दा यामध्ये अधोरेखित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यभर गेल्या तीन दिवसांपासून जिल्हास्तरावर लाक्षणिक आंदोलन सुरू असून, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काल वसमत येथे व्हाइस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या संघटनेने एक दिवसीय आंदोलन वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले .
यूपी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास माने यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
निवेदनात प्रमुख मागण्यांमध्ये शासकीय जाहिरात दरात किमान 150 टक्के वाढ, ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, तसेच जाहिरातींसाठी किमान 200 चौ. से. आकार निश्चित करणे यांचा समावेश आहे. याशिवाय शासकीय जाहिरातींची देयके 30 दिवसांच्या आत अदा करावी व विलंब झाल्यास व्याज देण्याची तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच मोठ्या वृत्तपत्रांप्रमाणेच लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी द्यावी, शासन निर्णय व बैठकींची माहिती पारदर्शक पद्धतीने प्रसिद्ध करावी, आणि सर्व जाहिराती माहिती खात्यामार्फतच वितरित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे, तसेच शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन निधीच्या अटी शिथिल करून 20 वर्षे सेवा व 55 वर्ष वय पूर्ण केलेल्या पत्रकारांना पेन्शनचा लाभ द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
यासोबतच जाहिरात यादीत समावेशासाठी प्रलंबित असलेल्या वृत्तपत्रांच्या तपासण्या तातडीने पूर्ण कराव्यात व 25 वर्ष पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आर्थिक अडचणींमुळे हा उद्योग कमकुवत झाल्यास जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होईल,” असे मत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केले.
वसमत येथे ग्रामीण आणि शहरी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शेकडो पत्रकार हे आंदोलना सहभागी झाले होते
या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री, माहिती व जनसंपर्क मंत्री आणि मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनाही देण्यात आली आहे.
