अवैध गौण खनिज प्रकरणी कारवाई; वसमत तहसीलदारांचे निलंबन
वसमत ( प्रतिनिधी) : तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे वसमतच्या तहसीलदारांना चांगलेच महाग पडले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून दखल घेत तहसीलदारांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
वसमत तालुक्यात मागील काही महिन्यांपासून वाळू, मुरूम आणि इतर गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अवैध व्यवसायामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत होता. यासंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींवर योग्य वेळी आणि कडक कारवाई न केल्याने तहसीलदारांवर संशयाची सुई होती.
कर्तव्यात कसूर करून अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी कार्यालय प्रमुख म्हणून नियंत्रण ठेवण्यात त्यांना अपयश. आले
नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून लेखी तक्रारींवर कोणतीही ठोस कार्यवाही न करणे.
वरिष्ठ कार्यालयाचे आदेश: जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या स्तरावरून झालेल्या प्राथमिक चौकशीत तहसीलदारांनी आपल्या अधिकारांचा वापर करून अवैध उत्खनन रोखले नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला.
सदरील प्रकरणी राज्याच्या महसूल विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट रोखण्यासाठी ही कठोर कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय निश्चित करण्यात आले असून, त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
या कारवाईमुळे महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. वसमत तालुक्यात आता नवीन तहसीलदारांची नियुक्ती कोणाची होते आणि अवैध उत्खननावर लगाम बसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
