वसमतमध्ये प्रशासनाचे धिंदवडे; तलाठी भवन बनले मटण विक्रीचे केंद्र!
कारंजा चौक ते पोलीस स्टेशन अतिक्रमण बनले कळीचा मुद्दा
वसमत (हिंगोली): शहराच्या मधोमध व कारंजा चौकात असलेले तलाठी भवन सध्या मांस विक्री व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येते
सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत आणि महसूल विभागाचे कामकाज गतिमान व्हावे यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेली शासकीय कार्यालये आज कोणत्या अवस्थेत आहेत, याचा संतापजनक नमुना वसमत शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील ‘तलाठी भवन’ सध्या चक्क मटण विक्रीचे केंद्र बनले असून, प्रशासनाच्या या ‘धिंदवड्या’मुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहराच्या वर्दळीच्या भागात असलेले व महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या तलाठी भवन सध्या जीर्ण अवस्थेत असल्याकारणाने अनधिकृत व्यवसायांनी पाय पसरले आहेत. या शासकीय इमारतीच्या परिसरात आणि ओट्यावर आता चक्क मटण कापून त्याची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय
ज्या इमारतीवर शासकीय पाटी आहे, जिथे लोकशाहीचा कारभार चालणे अपेक्षित आहे, तिथे रक्तामासाचा सडा आणि मटणाची विक्री होत असताना स्थानिक महसूल प्रशासनाला व नगरपरिषदेला याची पुसटशी कल्पना कशी नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हे सर्व प्रकार सुरू असताना संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, असा संशयही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सदरील मोक्याची जागा ही भूमाफियांच्या हातात जाण्याची शक्यता आ. राजू भैया नवघरे यांच्या कानावर गेली होती या प्रकरणात आमदार महोदयांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते
शासकीय मालमत्तेचा असा दुरुपयोग होत असल्याने शासनाच्या नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या प्रकारामुळे महसूल विभाग व नगरपरिषद यांची मोठी बदनामी होत असून, तातडीने या ठिकाणचे अनधिकृत अतिक्रमण हटवावे व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
जर प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात या इमारतींचा वापर अजून कोणत्या अवैध कामांसाठी होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
सदरील प्रकरणात नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही
आता या प्रकरणावर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
