मरसुळ-नांदेड बायपासचे काम तातडीने सुरू करा; रेल्वे संघर्ष समितीची मागणी
वसमत (प्रतिनिधी) :
*राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांना व्यापारी व नागरिकांचे निवेदन; रेल्वे सुविधा वाढविण्याची मागणी*
*प्लॅटफॉर्म क्रमांक २ चे काम त्वरित पूर्ण करण्याची अपेक्षा*
*रेल्वे स्थानकावर कोच इंडिकेटर बसविण्याची मागणी*
मरसुळ-नांदेड बायपास रस्त्याचे मंजूर झालेले काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावे तसेच वसमत रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी वसमत येथील रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मरसुळ-नांदेड बायपास रस्त्याचे काम मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या मार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास वाहतुकीची मोठी समस्या दूर होऊन परिसरातील नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना निर्देश देऊन हे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय वसमत हे मराठवाड्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून रेल्वे प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनेक एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना येथे थांबा नसल्याने व्यापारी, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे वसमत रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच जालना-अकोला ही दैनिक रेल्वे सेवा नियमित सुरू ठेवावी व गाडी क्रमांक 17605/17606 काचिगुडा-भगत की कोठी (पूर्णा मार्गे) या रेल्वेला वसमत येथे थांबा मंजूर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकावरील अपूर्ण सुविधांकडे लक्ष वेधत वसमत रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ चे रखडलेले काम तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी कोच इंडिकेटर यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांनी व्यापारी व नागरिकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विभागांकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या मागण्या मान्य झाल्यास वसमतसह परिसरातील हजारो प्रवाशांची गैरसोय दूर होऊन व्यापारी व नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या निवेदनावर दीपक जनार्धन कुल्थे, सचिन बाबडे, आशिष दलाल, नवीन चोकडा , सागर दलाल, जगदीश मोरे, एम. इब्राहिम, मजामन सातपुते, साईनाथ पतंगे, सोपान काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
