उपजीविकेसोबतच जपला कलेचा वारसा; नंदिनीने साकारल्या शेकडो विलोभनीय गणेशमूर्ती!
वसमत प्रतिनिधी :
गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना, वसमत येथील एका शालेय विद्यार्थिनीने आपल्या कलेच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नंदिनी लक्ष्मण पेंढारकर इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या या गुणी विद्यार्थिनीचे नाव असून, तिने आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी चक्क शेकडो विलोभनीय गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
तिच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे ‘कलेचा वारसा आणि कुटुंबाची जबाबदारी’ एकाच वेळी कशी पेलता येते, याचा आदर्श तिने समाजासमोर ठेवला आहे.नंदिनी ही अजून शालेय शिक्षण घेत आहे. मात्र, घरातूनच मिळालेल्या कलेच्या वारशाचा योग्य वापर करत तिने व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारला. घरच्या बेताच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी तिने गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू केले. केवळ छंद म्हणून न थांबता, तिने अत्यंत सुबक, आकर्षक आणि विलोभनीय अशा शेकडो मूर्ती स्वहस्ते तयार केल्या आहेत.
मी शालेय विद्यार्थिनी असून कुटुंबाला उपजीविकेसाठी आर्थिक हातभार लागावा व शैक्षणिक खर्च व कौटुंबिक गरजा यासाठी आई-वडिलांना आधार व्हावा यासाठी गणेश मूर्ती तयार करताना कुटुंबासोबत मदत करते
नंदिनी लक्ष्मण पेंढारकर, शालेय विद्यार्थिनी व मूर्तिकार
तिने साकारलेल्या गणेशमूर्तींना वसमत आणि परिसरातील भाविकांकडून मोठी पसंती मिळत आहे. या मूर्तींच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे नंदिनी आपल्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक आधार देत आहे. शिक्षण सांभाळून, कलेची जोपासना करत कुटुंबाची उपजीविका चालवण्यात मदत करणाऱ्या नंदिनीच्या या जिद्दीचे आणि कौशल्याचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.
