सर्व्हे नं. १८० प्रकरणात एका महिन्यात निष्पक्ष अहवाल सादर करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
चौकशी समितीचा अहवाल रखडल्या प्रकरणी नागरिकांची विभागीय आयुक्तांकडे धाव
वसमत ( प्रतिनिधी):
वसमत नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व्हे नं. १८० प्रकरणात चौकशी समिती अहवाल रखडल्याप्रकरणी व होत असलेल्या दिरंगाई मुळे सामान्य नागरिकांनी विभागीय आयुक्ताकडे धाव घेऊन सदरील प्रकरणाचा निष्पक्ष व स्वतंत्र अहवाल सादर करावा यासाठी मागणी केली आहे
बनावट कागदपत्रांच्या आधारे सार्वजनिक मालमत्तेवर हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यासाठी नागरिकांनी आता थेट विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
या प्रकरणी यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र समिती स्थापन होऊन बराच कालावधी उलटूनही अंतिम अहवाल अद्याप समोर आलेला नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चौकशीचा अहवाल नेमका कुठे रखडला, त्यामागे कोणाचा दबाव आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
सर्व्हे नं. १८० संदर्भातील संपूर्ण अभिलेख, मूळ मालकीचे कागदपत्रे, नामांतरण नोंदी, रजिस्ट्रीशी संबंधित दस्तऐवज तसेच नगररचना विभागातील नोंदींची बारकाईने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर झाल्याची तक्रार यापूर्वी पोलिसांत दाखल झाली असून त्यावरून गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.
नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या निवेदनात चौकशी कोणत्याही राजकीय अथवा स्थानिक दबावाशिवाय करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तींसह त्यांना मदत करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनातील तक्रारी, चौकशी व कार्यवाहीसाठी विभागीय स्तरावरही यंत्रणा उपलब्ध असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यासाठी निश्चित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या माहितीत नमूद आहे.
सार्वजनिक मालमत्तेशी संबंधित एवढे गंभीर प्रकरण असताना चौकशी अहवाल लांबणीवर का पडला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आता विभागीय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाची चौकशी वेग घेणार का आणि सर्व्हे नं. १८० प्रकरणातील खरे सूत्रधार कोण, हे स्पष्ट होणार का, याकडे वसमतकरांचे लक्ष लागले आहे.
