७९ लाखांचा निधी गेला कुठे? वसमत उपजिल्हा रुग्णालयातील ‘NQAS’ योजनेत कोट्यवधींचा झोल!
वसमत उपजिल्हा रुग्णालयातील लाखो रुपयांच्या कामांची तांत्रिक व आर्थिक चौकशीची मागणी
वसमत (प्रतिनिधी ) :
शासनाच्या विशेष आरोग्य सुविधा योजनेत येणाऱ्या NQAS अंतर्गत वसमत उपजिल्हा रुग्णालयात 79 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला होता त्या अंतर्गत मंजूर झालेली कामे व निधी यात लाखोंचा अपहार झाल्याचा प्रथम दर्शनी दिसून येत आहे
मंजूर झालेली कामे व त्यासाठी असलेला निधी याची कुठेही मूल्यमापन व त्याचा दर्जा अधोरेखित होताना दिसत नाहीये त्यामुळे या योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे
वसमत उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानक (NQAS) अंतर्गत मॉड्युलर पीएम रूम, डायलिसिससाठी यूपीएस, बर्न वॉर्ड, सीएसएसडी, अॅडव्हान्स लॅब, ऑपरेशन थिएटर, सुरक्षा कक्ष, प्रशिक्षण कक्ष व इतर अशा २३ सुविधा मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र, यापैकी किती कामे पूर्ण झाली आणि किती सुविधा प्रत्यक्ष रुग्णसेवेत कार्यरत आहेत, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मंजूर निधीचा प्रत्यक्ष वापर, कामांची गुणवत्ता आणि सुविधांची सद्यस्थिती तपासण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्याची मागणी होत आहे. प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रके, कार्यादेश, मोजमाप पुस्तिका, बिले, देयके आणि पूर्णत्व प्रमाणपत्रांची तपासणी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
डायलिसिस विभागासाठी मंजूर यूपीएस कार्यरत आहे का, तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास उपचारांवर परिणाम होतो का, याचीही तांत्रिक पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“रुग्णांच्या नावावर मंजूर झालेल्या निधीचा प्रत्यक्ष लाभ रुग्णांना मिळाला पाहिजे. कागदावरील मंजुरी आणि प्रत्यक्षातील सुविधा यामध्ये तफावत असल्यास ती चौकशीतून स्पष्ट झाली पाहिजे,” अशी नागरिकांची भूमिका आहे.
दरम्यान, संबंधित आरोग्य विभाग व प्रशासनाने सर्व मंजूर कामांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
