स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे लायन्स क्लब कडून आयोजन
वसमत प्रतिनिधी :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून के. सी. पारख लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी संचलित लायन्स नेत्र रुग्णालय, परभणी आणि लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दिनांक १५ ऑगस्ट २०२६ (शनिवार) रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर असलेल्या प्रसाद लालपोतू यांच्या जनरिक मेडिकल येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, अल्प दरात उच्च दर्जाचे चष्मे, मोतीबिंदूची तपासणी, गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच डोळ्यांशी संबंधित विविध आजारांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अनुभवी नेत्रतज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी केली जाणार आहे.
लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून, हजारो नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून अनेक गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. या शिबिराद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
विशेषतः माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“निरोगी डोळे हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. योग्य वेळी तपासणी करून अनेक गंभीर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.”
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समाजामध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.
कृपया या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष संजय बेंडके व प्रोजेक्ट चेअर पर्सन प्रसाद लालपोतू यांनी केले आहे.
