आ. राजू भैया नवघरे थेट भूकंपग्रस्तांच्या दारी; सांत्वन करत दिला मदतीचा धीर
वसमत (प्रतिनिधी):
हिंगोली जिल्ह्यासह वसमत परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांनी तातडीने सक्रिय होत, कोणत्याही शासकीय औपचारिकतेची वाट न पाहता थेट भूकंपग्रस्त गावांना भेटी दिल्या. संकटाच्या काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वास देत त्यांनी ग्रामस्थांचे सांत्वन केले.
पांगरा शिंदे तसेच परिसरातील गावातील प्रत्यक्ष घरांची पाहणी आणि भूकंपामुळे अनेक घरांना तडे गेले असून काही ठिकाणी पडझड झाली आहे. आमदार नवघरे यांनी गावागावात जाऊन बाधित घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेषतः ग्रामीण भागातील कच्च्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली. वृद्ध, महिला आणि बालकांशी संवाद साधून त्यांनी सर्वांना धीर दिला. “घाबरू नका, आपण या संकटातून नक्कीच बाहेर पडू,” अशा शब्दांत त्यांनी नागरिकांचे मनोबल उंचावले.
केवळ सांत्वन करून न थांबता, आमदार नवघरे यांनी महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एकही बाधित कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
“नैसर्गिक आपत्तीवर कोणाचे नियंत्रण नसते, मात्र आपत्तीनंतर मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे,” असे मत राजू भैया नवघरे यांनी यावेळी व्यक्त केले. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ज्या कुटुंबांची राहण्याची सोय धोक्यात आली आहे, त्यांच्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
