“अखेर नगरपालिकेचा ‘बुलडोझर’ गरजला! आता रस्ते मोकळा श्वास घेणार की पुन्हा जैसे थे?”
वसमत (प्रतिनिधी ) :
वसमत शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या मुख्य रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि पदपथांवर वाढलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि हातगाड्यांवर नगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची वाढती तक्रार लक्षात घेता प्रशासनाला अखेर ‘जाग’ आली असून, या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, ही कारवाई कायमस्वरूपी टिकणार की केवळ ‘औटघटकेचा’ फार्स ठरणार, असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
आज सकाळपासूनच नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात शहरातील कारंजा चौक मोहिमेला सुरुवात केली. पोलीस स्टेशन ते झेंडा चौक या रस्त्याच्या कडेला असलेले अनधिकृत शेड, जाहिरातींचे फलक आणि अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. काही ठिकाणी पक्क्या बांधकामांवरही बुलडोझर फिरवण्यात आला. यामुळे मुख्य रस्ते प्रशस्त झाले असून वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नगरपालिकेने यापूर्वीही अनेकदा अशा कारवाया केल्या आहेत. मात्र, कारवाईचा पथक पाठ फिरवताच अवघ्या काही तासांत अतिक्रमण पुन्हा ‘जैसे थे’ होते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळेच, आजच्या या धडक मोहिमेनंतरही नागरिकांमध्ये साशंकता आहे. “नगरपालिका दरवेळी कारवाई करते, पण काही दिवसांत परिस्थिती पुन्हा तशीच होते. ही कारवाई केवळ कागदोपत्री न राहता, प्रशासनाने सातत्य राखणे गरजेचे आहे,” अशी भावना एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली.
यावेळी नगरपालिकेचा मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग तसेच पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
अतिक्रमणामागे अनेकदा स्थानिक नेत्यांचा वरदहस्त असतो, हे उघड गुपित आहे. निवडणुकीच्या काळात किंवा मतपेढी जपण्यासाठी अनेकदा या कारवाया थंडावतात. यंदाची कारवाई कोणत्याही दबावाला बळी न पडता शेवटपर्यंत तडीस नेली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एकीकडे अतिक्रमण हटवताना, हातावर पोट असलेल्या छोट्या विक्रेत्यांसाठी ‘हॉकर्स झोन’ निश्चित करणे आवश्यक आहे. जोपर्यंत विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत ते रस्त्यावर परतत राहणारच. नगरपालिकेने केवळ कारवाईवर भर न देता नियोजनावरही काम करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहेत. आता पालिकेचा हा पवित्रा शहराचा कायापालट करणार की काही दिवसांनी पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती ओढवणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
