वसमत तालुक्यात १०० % नव मतदार नोंदणीचे लक्ष्य; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
वसमत प्रतिनिधी :
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत नव मतदार नोंदणी मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक ८ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी २.०० वाजता माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली वसमत तहसीलदार वसमत यांचे कक्षामध्ये वसमत तालुक्यातील सर्व शासकीय व अशासकीय महाविद्यालयांच्या प्राचार्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अनुषंगाने मा.उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे तालुक्यातील महाविद्यालयनिहाय १८ वर्षावरील विद्यार्थ्यांची आकडेवारी सादर केली.
यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले प्रमुख निर्देश:
१. दिनांक 01 ऑक्टोंबर 2026 रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची नाव नोंदणी नमुना-६ द्वारे करून घ्यावी.
२. प्रत्येक महाविद्यालयात मतदार साक्षरता मंडळ (Electoral Literacy Club) व नोंदणी सहाय्यता कक्ष स्थापन करावा. त्यासाठी एका प्राध्यापकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.
३. महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळीच विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणी अर्ज भरून घेण्याची कार्यपद्धती अवलंबावी.
४. विशेष शिबिरांचे आयोजन करून बीएलओ (Booth Level Officer) यांच्या सहकार्याने मोहीम पूर्ण करावी.
५. SVEEP कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मतदार जनजागृतीसाठी निबंध, वक्तृत्व, रॅली व पथनाट्याचे आयोजन करावे.
ऑक्टोबर 2024 नंतर मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला नसल्यामुळे दि. 1 ऑक्टोबर 2024 नंतर वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या अनेक नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविता आले नव्हते. आता दि. 1 ऑक्टोबर 2026 हा अहर्ताकारी दिनांक निश्चित करण्यात आला असून, या दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
दि. 1 ऑक्टोबर 2026 या अहर्ताकारी दिनांकानुसार 18 वर्षे पूर्ण झालेल्या आणि अद्याप मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या युवकांची संख्या मोठी आहे. या युवकांना मतदार नोंदणीची प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करता यावी, यासाठी महाविद्यालयांच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावेत, अशा सूचना मा.जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत महाविद्यालयांमध्ये ही विशेष शिबिरे घेण्यात येतील. पात्र युवकांनी आपल्या महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात सहभागी होऊन मतदार नोंदणीसाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करावीत. महाविद्यालयांनीही शिकवणी वर्गांदरम्यान विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीबाबत माहिती द्यावी आणि पात्र नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
महाविद्यालयांनी मतदार नोंदणीसाठी महाविद्यालय स्तरावर विशेष उपक्रम राबवावेत. जनजागृतीवर भर द्यावा जेणेकरुन जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी होईल अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
नमुना-6 संकेतस्थळावर उपलब्ध
नवीन मतदार नोंदणीसाठीचा नमुना-6 जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोलीच्या nic.hingoli संकेतस्थळावर ‘निवडणूक विभाग’ या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे. पात्र नागरिकांनी नमुना-6 भरून मतदार नोंणीची प्रक्रिया पूर्ण करावी.
लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक पात्र नागरिकाचा महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र युवकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे. तसेच मतदार यादीतील आपली नोंद तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्यावी आणि विशेष सखोल पुनरिक्षणाच्या दावे व हरकती कालावधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी महोदयांनी केले.
या बैठकीस मा उपजिल्हा निवडणूक अधिकारी हिंगोली, मा. उपजिल्हाधिकारी (महसूल ) जिल्हा हिंगोली, मा .उपविभागीय अधिकारी वसमत, तहसीलदार वसमत, नायब तहसीलदार तसेच वसमत तालुक्यातील 7 महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यावतीने त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
