गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे – जयप्रकाश दांडेगावकर
येलदरी व सिद्धेश्वर धरणातून पाणी उपलब्धतेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – आ. राजूभैया नवघरे
पुर्णा सहकारी साखर कारखाना लि.,वसमतनगर ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
वसमत प्रतिनिधी :
पुर्णा सहकारी साखर कारखाना लि.,वसमतनगर, जि.हिंगोली या कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,दि.२० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता कारखान्याचे अध्यक्ष मा. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सभासदां समोर विषयपत्रिकेवरील विविध विषय मांडले.यावेळी सभासदांनी प्रत्येक विषयावर चर्चा केली.अध्यक्षांनी मांडलेले विषय एक-एक करून सभेपुढे ठेवण्यात आले आणि सभेने त्यांना मान्यता दिली.
यावेळी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी कारखाना पुन्हा सुरू करून कार्यान्वित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले. कारखान्याच्या उभारणीचा आणि पुनरुज्जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुभैय्या नवघरे यांनी उपस्थित सभासदांशी संवाद साधला.पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच ऊस उत्पादनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याची भुमिका त्यांनी मांडली.
येलदरी व सिद्धेश्वर धरणातुन शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार नवघरे यांनी सांगितले.पाण्याची उपलब्धता वाढल्यास शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादकांना त्याचा लाभ होऊ शकतो,या दृष्टीने त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
या सभेला माजी आमदार पंडितराव देशमुख,वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे,ज्येष्ठ सभासद भगवानराव आलेगावकर,ॲड.रामचंद्र बागल,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतु यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक,सभासद,कार्यकारी संचालक अमोल पाटील व सर्व अधिकारी उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कारखान्याच्या शेती व ऊसविकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले.
सभेच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा सुर या सभेत उमटला.
