मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा ने वेधले लक्ष
वसमत प्रतिनिधी :
वसमत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते रविकिरण वाघमारे यांच्या उपोषणाचा आज 10 वा दिवस असुन मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून कौठा आणि खांडेगाव सर्कलमधून तब्बल ३०० ट्रॅक्टरचा धडक मोर्चा वसमत तहसील कार्यालयावर धडकला.
या मोर्चामुळे वसमत शहरातील मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. “एक मराठा, लाख मराठा”, “मनोज दादा तुम आगे बढे, हम तुम्हारे साथ है”, “आरक्षण आमच्या हदकाचे, नाही कुणाच्या बापाचे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
कौठा-खांडेगाव सर्कलमधून शेतकन्यांचा एल्गार
आज सकाळी १० वाजल्यापासून कौठा आणि खांडेगाव सर्कलमधील विविध गावांमधून ट्रॅक्टर एकत्र येऊ लागले होते. प्रत्येक ट्रॅक्टरवर भगवे झेंडे, मराठा आरक्षणाचे फलक आणि मनोज जरांगे पाटील यांचे फोटो लावण्यात आले होते. शेतकन्यांनी आपल्या शेतीची कामे बाजुला ठेवून या मोर्चात सहभाग घेतला.
कौठा येथून निघालेला मोर्चा कौठा टि पॉईट-वसमत मार्ग तर खांडेगाव सर्कलमधील ट्रॅक्टर पांगरा मार्ग वसमतकडे आले. दोन्ही मोर्च वसमत शहराच्या प्रवेशद्वारावर एकत्र आले आणि तिथून एकच भव्य मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला. जवळपास ५ किलोमीटरपर्यत ट्रॅक्टरची रांग लागली होती, ज्यामुळे हे आंदोलन किती तीव्र आहे याचा अंदाज येत होता.
तहसील कार्यालयासमोर उपोषणाला पाठिंबा
वसमत तहसील कार्यालयासमोर गेल्या 10 दिवसांपासून रविकिरण वाघमारे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला वसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असतानाही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच हा ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचताच उपोषणकर्ते रविकिरण वाघमारे यांना मराठा बांधवांनी भेट दिली. यावेळी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांनी सरकारने तात्काळ मराठा समाजाला OBC प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, अशी एकमुखी मागणी केली.
यावेळी बोलताना काही आंदोलकांनी सांगितले की, “आमचा लढा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. आम्हाला फक्त आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण हवे आहे. मनोज जरांगे पाटील जे लढत आहेत ते संपूर्ण मराठा समाजासाठी लढत आहेत.
वसमतमध्ये वाहतूक ठप्प, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
३०० ट्रॅक्टर एकाच वेळी वसमत शहरात दाखल झाल्यामुळे मुख्य बाजारपेठ आणि तहसील कार्यालय परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती. परिस्थितीचे गंभीर्य लक्षात घेऊन वसमत पोलिसांनी आधीच चोख बंदोबस्त ठेवला होता.
पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून मोर्चा शांततेत पार पडेल याची काळजी घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिस कुमक मागवण्यात आली होती. पोलिसांच्या सहकार्यामुळे मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला, याबद्दल आंदोलकांनीही पोलिसांचे आभार मानले.
गेल्या दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभरात जनजागूती केली आहे. त्यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला आहे. वसमत हा हिंगोली जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका असून येथे मराठा समाजाची संख्या मोठी आहे.
मोर्चानंतर आंदोलकांनी म्हटले आहे की, जोपर्यत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. येत्या काळात गरज पडल्यास मुंबईकडे जाणारा रस्ता रोखण्याचा इशाराही यावेळी देण्याात आला.
