नगरपालिकेच्या सर्वे न. 180 प्रकरणात न्यायालयाचे निर्देश ; दोन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
वसमत ( प्रतिनिधी) :
वसमत नगरपालिकेच्या गाजत असलेल्या सर्वे नंबर 180 मधील वादग्रस्त जागेच्या नामांतराचा विषय चांगलाच गाजत असताना शेवटी न्यायालयाने सदरील प्रकरणात कडक निर्देश देत दोन आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
काय आहे प्रकरण?
नगर रचना सहाय्यकांच्या नावे बनावट प्रमाणपत्र तयार करून चक्क खरेदीखत बनवण्याचा प्रकार वसमतमध्ये उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकरणातील दोन्ही आरोपींना वसमत जिल्हा सत्र न्यायालयाने आज (दि. ७) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
२२ मे २०२६ रोजी वसमत येथील साहाय्यक निबंधक कार्यालयात हा प्रकार घडला. नगरपरिषद वसमतचे कर प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मसाजी जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आरोपी देवानंद बाबाराव साळळे (वय ३२, रा. कोर्टा, चोंडी बहिरोबा) आणि मंगेश नंदकिशोर पारवेकर (वय ३३, रा. ब्राम्हणगल्ली, वसमत) यांनी आपसात संगनमत केले. त्यांनी नगर रचना सहायक, वसमत यांच्या स्वाक्षरीचे गावठाण लगतचे एक बनावट प्रमाणपत्र तयार केले. एवढेच नव्हे, तर हे खोटे कागदपत्र खरे भासवून त्याचा वापर करून खरेदीखतही तयार केले.
या फसवणुकीच्या प्रकारानंतर वसमत शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आज न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी दिल्याने चौकशीतून आणखी काही बऱ्याच गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेवटी सदरील प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करून शासनाच्या मूल्यवान जागा अबाधित रहाव्या यासाठी कठोर चौकशी करून आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
