शासकीय स्त्री रुग्णालयाच्या रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात गुलाबपुष्प अर्पण करून अनोखा निषेध
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे-थोरावेकर यांचा १५ ऑगस्टपर्यंत दुरुस्तीचा अल्टिमेटम, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
वसमत प्रतिनिधी
वसमत शहरातील शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांनी अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरून रुग्णालयाकडे जाणाऱ्या वळणावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे-थोरावेकर यांनी चक्क खड्ड्यांनाच गुलाबपुष्प अर्पण करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रहार केला.
रुग्णालयाच्या प्रवेशमार्गावरील नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गजाळ्याखाली योग्य बांधकाम न झाल्याने काही दिवसांतच नाली खचली आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. परिणामी रुग्ण, गर्भवती महिला, डॉक्टर, रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तरीही संबंधित विभाग आणि कंत्राटदाराकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
निषेधावेळी प्रशांत लोखंडे-थोरावेकर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, रस्ता व नालीचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने नव्याने करण्यात यावे. भविष्यात या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.
यासोबतच त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण न झाल्यास १५ ऑगस्टपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, वसमत समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा थेट इशारा दिला.
या अनोख्या आंदोलनामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून, आता प्रशासन खड्डे बुजविण्यासाठी तातडीने पावले उचलणार का, की नागरिकांना आणखी संघर्ष करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
