वसमत आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘लालपरी’ दाखल; आ. राजूभैया नवघरे यांच्या हस्ते लोकार्पण!
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत परिसरातील प्रवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. वसमत बस आगाराच्या (डेपो) सेवेमध्ये मोठी भर पडली असून, प्रवाशांच्या दिमतीला ५ नवीन एसटी बसेस (लालपरी) दाखल झाल्या आहेत. या नवीन बसेसचे लोकार्पण वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या ‘लालपरी’ची संख्या वाढल्यामुळे वसमत तालुक्यातील प्रवासी वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. अनेक दिवसांपासून नवीन बसेसची मागणी होत होती. ती आता पूर्ण झाली असून यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि वेळेवर होणार आहे.
बसेसचे पूजन करून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलताना आमदार राजूभैया नवघरे म्हणाले की, “वसमत मतदारसंघातील नागरिकांना उत्तम दळणवळणाची सुविधा मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. या ५ नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातील फेऱ्या वेळेवर चालण्यास मदत होईल. भविष्यातही एसटी महामंडळाच्या माध्यमातून आगाराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आम्ही कार्य करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
यावेळी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
