आषाढी वारी पाऊस घेऊनच परतणार; २२ जुलैपासून मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी ) :
मराठवाड्यातील चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या बळिराजासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आषाढी वारीचा सोहळा आटोपून परतीच्या प्रवासाला लागलेले वारकरी मराठवाड्यासाठी पावसाची भेट घेऊनच परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या २२ जुलैपासून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वारी परतीला, वरुणराजाच्या आगमनाची वेळ!आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर याच काळात वातावरणात मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. वारीच्या सांगतेसोबतच मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकरी राजाचे आशा पल्लवीत झाल्या आहेत
नांदेड येथील ‘एमजीएम एपीजे अब्दुल कलाम ॲस्ट्रो स्पेस अँड सायन्स सेंटर’चे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार होत असून त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर 22 जुलै नंतर वाढणार आहे
.या जिल्ह्यांना मिळणार मोठा दिलासा
काही दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारली होती. काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या, तर कुठे दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र, २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या या नवीन स्पेलमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना हवामान विभागाचा सल्ला२२ जुलै ते २५ जुलै या दरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना योग्य ती काळजी घ्यावी, तसेच पिकांवर खते किंवा कीटकनाशकांची फवारणी करायची असल्यास ती हवामानाचा अंदाज घेऊनच करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
