निवडणूक आयोगाच्या मोहिमेसाठी वसमतचे एसडीओ विकास माने स्वतः घरोघरी!
वसमत (प्रतिनिधी) :
भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला वसमत तालुक्यात वेगळीच गती मिळाली आहे.वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केवळ कार्यालयात बसुन आढावा घेण्याऐवजी स्वतःमैदानात उतरून मतदारांच्या घरोघरी भेटी देत SIR फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांना या कार्यक्रमाचे महत्त्व समजावुन सांगत मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिलेल्या माहितीनुसार,SIR कार्यक्रमाच्या कामगिरीत वसमत विधानसभा मतदारसंघ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर,तर हिंगोली लोकसभा मतदारसंघ पहिल्या क्रमांकावर आहे.या उल्लेखनीय यशाचे श्रेय त्यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाला दिले.
भारत निवडणुक आयोगाच्या नियोजनानुसार ३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओमार्फत घरोघरी भेटी देऊन मतदार पडताळणी,नवीन मतदारांची नोंदणी तसेच आवश्यक प्रपत्रे भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेला अधिक गती मिळावी आणि कामात पारदर्शकता राहावी यासाठी उपविभागीय अधिकारी विकास माने स्वतःनागरिकांच्या दारात पोहोचुन फॉर्म भरून घेत आहेत.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी थेट घरपोच येऊन निवडणुक प्रक्रियेची माहिती देत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्यासह समाधानाची भावना व्यक्त होत आहे.अधिकारी आणि कर्मचारी स्वतः घरी येऊन मार्गदर्शन करत असल्यामुळे मतदारांकडुनही या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासोबत तहसील कार्यालयाचे कर्मचारी अनिल पाटील,बीएलओ बेंडे सर,आळणे सर तसेच निवडणुक विभागाचे इतर कर्मचारी आणि संबंधित भागातील बीएलओ प्रत्यक्ष क्षेत्रात फिरून काम करत आहेत.या उपक्रमामुळे तालुक्यातील मतदार यादी अधिक अचुक,अद्ययावत आणि त्रुटीमुक्त होण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी स्वतःघरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेणे आणि SIR फॉर्म भरून घेण्याच्या उपक्रमाचे वसमत शहरासह तालुकाभर कौतुक होत असुन,प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे हे एक सकारात्मक उदाहरण मानले जात आहे.
यावेळी ओमप्रकाश महाकाळे, पत्रकार बालाजी अडकिने तसेच नितीन वाघिले उपस्थित होते.
