गोशाळांनी ‘गो-उद्यम’ मॉडेल स्वीकारून स्वावलंबनाकडे वाटचाल करावी – राज्यमंत्री दर्जा अध्यक्ष शेखरजी मुंदडा
वसमत, दि. २९ : महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यमाता–गोमाता संवाद यात्रा सोमवार, दि. २९ जून रोजी वसमत शहरात दाखल झाली. माळवटा येथील बाफना ट्रेडर्स येथे गोसेवाप्रेमी शितल बाफना, राधेश्याम मंत्री, अभय जैन, अशोक अडकीने , संजीव बेंडके,राजू सिद्दिकी तसेच लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांच्या वतीने यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी गाय व वासरू यांची पायी दिंडी काढण्यात आली. भजन, नामस्मरण आणि जयघोषाच्या वातावरणात दिंडी सभामंडपात पोहोचल्यानंतर गोमातेची विधिवत आरती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. शेखरजी मुंदडा (राज्यमंत्री दर्जा, अध्यक्ष – महाराष्ट्र गोसेवा आयोग, महाराष्ट्र शासन), डॉ. सुनील सुर्यवंशी (सदस्य – महाराष्ट्र गोसेवा आयोग), उद्धव नेरकर (सदस्य – महाराष्ट्र गोसेवा आयोग), मुकुंद आण्णा शिंदे (वरिष्ठ संचालक – महा एनजीओ फेडरेशन), नितीन चिलवंत (मुख्य सारथी – राज्यमाता–गोमाता संवाद यात्रा) तसेच वसमतच्या नगराध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती, शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार, माजी उपनगराध्यक्ष सिताराम मॅनेवार, नगरसेवक शिवाजी आल्डिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. जयप्रकाशजी मुंदडा व नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर मार्गदर्शन करताना महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा म्हणाले की, “गोशाळा केवळ दानधर्मावर चालणाऱ्या संस्था न राहता त्या ‘गो-उद्यम’ म्हणून विकसित होणे ही काळाची गरज आहे. गोमूत्र, शेणखत, जैविक उत्पादने आणि पंचगव्य निर्मिती यांसारख्या उपक्रमांमधून गोशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनू शकतात. गोसेवकांना शासनामार्फत आवश्यक प्रशिक्षण, विमा संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी आयोग सातत्याने प्रयत्नशील आहे. गोवंश संवर्धन ही केवळ धार्मिक भावना नसून पर्यावरण संरक्षण, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी लोकचळवळ आहे. प्रत्येक गावात गोसेवा आणि गोसंवर्धनाची चळवळ उभी राहिली, तर ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे अध्यक्ष राजू सिद्दिकी, संजीवकुमार बेंडके, बाळासाहेब बेले, कल्याण कुरुंदकर, अशोकराव आडकिने तसेच सर्व गोसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत गोसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागाची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बेले यांनी केले
