न.प. सर्वे नंबर १८० घोटाळा : दोघांवर गुन्हा दाखल; तपासात आणखी मोठे गैरव्यवहार बाहेर येण्याची शक्यता!
* शासनाने केली त्री सदस्यीय समिती स्थापन
वसमत (प्रतिनिधी) :
बहुचर्चित नगरपरिषद (न.प.) सर्वे नंबर १८० मधील कथित भूखंड घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन संशयितांवर अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपरिषद हद्दीतील सर्वे न. 180 मधील अवैध नामांतर प्रकरणी शासनाची त्रिसदस्य समिती तपास करणार असून यामध्ये सदरील सर्वे नंबर 180 अंतर्गत अजून घोटाळे उघडकीस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
या प्रकरणी कर प्रशासकीय सेवा (श्रेणी ब) चे ज्ञानेश्वर मसाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गुट्टे यांनी पुढील कारवाई केली.
१. देवानंद बाबाराव साबळे (रा. कोर्ट ता, वसमत)
२. मंगेश नंदकिशोर पारवेकर (रा. ब्राह्मण गल्ली, वसमत)
यांच्यावर कलम ४१७, ३३६(२), ३३७, ३३९, ३४०(२), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
समितीची स्थापना आणि सूत्रधारांवर कारवाईची टांगती तलवार
बनावट सही, शिक्के आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन लाटणाऱ्यांना आता अजिबात माफी मिळणार नाही, असा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाने एक विशेष समिती गठीत केली आहे. केवळ नोकरच नव्हे, तर या कटामागे असलेले ‘मूळ मालक’ आणि मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा छडा लावण्यासाठी ही समिती आता सक्रिय झाली आहे.
सरकारी जमिनीच्या या गैरव्यवहारामुळे प्रशासनाची फसवणूक करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असल्याने, या घोटाळ्यातील मास्टरमाईंड लवकरच गजाआड होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता ही समिती नेमकी कोणापर्यंत पोहोचते आणि यात आणखी कोणते बडे मासे गळाला लागतात, याकडे संपूर्ण वसमतवासीयांचे लक्ष लागले आहे.
हे प्रकरण सध्या शहरात चर्चेचा विषय ठरले असून, प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे भ्रष्ट प्रवृत्तींचे धाबे दणाणले आहेत.
प्राथमिक तपासानंतर करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या सखोल तपासातून नगरपरिषदेचे इतरही अनेक छुपे घोटाळे बाहेर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे
