वसमत नगरपालिकेत ‘कुंपणच शेत खातेय’; भूखंड घोटाळ्याचा थरारक पर्दाफाश!
वसमत (प्रतिनिधी ) :
वसमत शहराच्या विकासाची आणि शासकीय मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांनीच संगनमताने कोट्यवधी रुपयांच्या शासकीय भूखंडांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार वसमत नगरपालिकेत उघडकीस आला आहे. वसमत नगर परिषदेच्या मालकीच्या मोक्याच्या जागेच्या कथित नामांतरणाच्या आणि हस्तांतरणाच्या हालचालींमुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, ‘कुंपणच शेत खातेय’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
बनावट दस्तऐवजांच्या आधारे सर्वे नंबर 180 मधील कोट्यवधींची मूल्यांकन असलेली जमीन खाजगी व्यक्तीच्या नावाने रिविजन रजिस्टरला कशी काय आली यातील मूळ सूत्रधार कर्मचारी व भूमाफिया कोण कोण आहेत हे सर्व पोलीस तपासा अंतर्गत होणाऱ्या चौकशीत उघड होणार का यावर सर्व स्तरातून नागरिक, संबंधित प्रशासन लक्ष ठेवून आहे
पालिकेच्या मालकीचे आणि जनतेच्या हक्काचे मौल्यवान भूखंड खाजगी घशात घालण्यासाठी मोठी यंत्रणा सक्रिय झाली आहे . शासकीय नियमांना हरताळ फासत, बनावट कागदपत्रे आणि खोट्या नोंदी तयार करून हे भूखंड लाटण्याचा कट रचला गेला. या भूखंडांची आजची बाजारपेठ किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.
सदरील प्रकरणात राजकीय वातावरण तापले असून आंदोलनाचा इशारा विरोधी पक्षाकडून देण्यात आला आहे या घोटाळ्याचा पर्दाफाश होताच वसमतमधील राजकारण पूर्णपणे तापले आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि काही नगरसेवकांनी पालिकेच्या या कारभाराविरोधात थेट उपोषणाचा आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जनतेच्या हक्काच्या पैशातून घेतलेली आणि शासकीय आरक्षणात असलेली जागा भूमाफियांना कशी काय बहाल केली जाते, असा सवाल आता विचारला जात आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी करून संपूर्ण प्रकरणात पालिकेतील काही बडे अधिकारी, कर्मचारी आणि बड्या राजकीय नेत्यांचे साट्यालोट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकार्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी आणि दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
