पाण्यासाठी जीव धोक्यात! मकोडीत विहिरीत कोसळलेल्या तरुणीचा ‘पुनर्जन्म’; नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांची तत्परता;तरुणीवर सेनगावमध्ये उपचार सुरू
सेनगाव ( हिंगोली) :
एकीकडे सरकार ‘हर घर जल’च्या घोषणा देत असताना, सेनगाव तालुक्यातील मकोडी येथे मात्र जलजीवन मिशनच्या ढिसाळ कारभारामुळे नागरीकांच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे.दि.२४ मार्च २०२६ मंगळवार रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेलेली अश्विनी थिटे (वय १७) ही तरुणी तोल जाऊन ३० फुट खोल विहिरीत कोसळली. सुदैवाने,परीसरातील कामगार आणि शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुखांच्या सतर्कतेमुळे या तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मकोडी गावची लोकसंख्या सुमारे २५०० आहे गावात मागील दीड वर्षांपासुन जलजीवन मिशनचे काम सुरू आहे,मात्र ते अद्याप पुर्ण न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.गावातील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी बोअर तसेच बंडु पाटील खरात यांच्या शेतातील विहिरीवर अवलंबून आहेत.मंगळवारी सकाळी अश्विनी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी गेली असता, विहिरीतून पोहरा ओढताना तिचा अचानक तोल गेला आणि ती थेट ४८ फूट खोल असलेल्या विहिरीत २५ ते ३० फुटांवर कोसळली.अश्विनी विहिरीत पडल्याचे लक्षात येताच जवळच असलेल्या विटभट्टीवरील कामगारांनी आरडाओरडा केला.तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत दोरी आणि बाज टाकुन मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.योगायोगाने याच वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख हे शेताकडुन येत असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली.त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.नागरीकांच्या मदतीने मुलीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर तिची प्रकृती खालावल्याचे पाहून,देशमुख यांनी तिला स्वतःच्याच वाहनात बसवुन तातडीने सेनगाव येथील बेंगाळ हॉस्पिटल मध्ये दाखल केले.डॉक्टरांच्या वेळेवर उपचारामुळे अश्विनीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.मकोडी गावात जलजीवन मिशनची योजना मंजुर होऊनही दीड वर्षात काम पूर्ण का झाले नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.”जर ही योजना वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण झाली असती,तर आज आमच्या मुलीला विहिरीवर जाण्याची आणि जीव धोक्यात घालण्याची वेळ आली नसती,”अशा भावना स्थानिक नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत.या घटनेनंतर तरी पाणीपुरवठा विभाग झोपेतुन जागा होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
