शैक्षणिक क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल! वसमतमध्ये ४,७०० विद्यार्थ्यांचा ‘नवोदय’चा महासराव
*राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या सातव्या वर्षातील उपक्रमाने रचला नवा विक्रम; तासाभरात निकाल*
*वसमत, दि. १ नोव्हेंबर (प्रतिनिधी) -* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि महाराष्ट्रात एक आदर्श ठरलेला शैक्षणिक उपक्रम आज वसमतमध्ये विक्रमी उत्साहात पार पडला. राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय मोफत नवोदय सराव परीक्षा 2026 चे सातवे वर्ष लाल बहादूर शास्त्री विद्यालय, वसमत येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले.

या परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तिन्ही माध्यमातील तब्बल 4700 विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रत्यक्ष परीक्षा दिली. सकाळपासूनच वसमत शहरात विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
*मोफत साहित्य आणि पक्के नियोजन -*
संस्थेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेसाठी लागणारे सर्व साहित्य – पॅड, पेन, ओ.एम.आर उत्तरपत्रिका आणि तज्ञ शिक्षकांनी तयार केलेला दर्जेदार प्रश्नसंच पूर्णपणे मोफत देण्यात आला. त्यामुळे गरीबातील गरीब विद्यार्थ्यालाही कोणताही खर्च न करता नवोदयच्या धर्तीवर परीक्षा देता आली.
या भव्य परीक्षेसाठी 156 परीक्षा कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेच्या शिस्तीसाठी 165 पर्यवेक्षक, 40 स्वयंसेवक शिक्षक आणि निकाल प्रक्रिया जलद करण्यासाठी 27 संगणक तज्ञांची विशेष टीम कार्यरत होती. सकाळी 10 वाजता सुरू झालेली परीक्षा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
*तासाभरात निकाल – महाराष्ट्रात एकमेव उपक्रम -*
या परीक्षेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि महाराष्ट्रात इतरत्र कुठेही न दिसणारे नियोजन म्हणजे परीक्षेनंतर अवघ्या एका तासात निकाल जाहीर करण्यात आला. संगणक तज्ञांच्या टीमने ओ.एम.आर तपासणी तात्काळ पूर्ण करून विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता आणि उणिवा समजावून सांगितल्या.
*सात वर्षांची अखंड शैक्षणिक चळवळ -*
आमदार राजू भैय्या नवघरे यांनी 2019 पासून सुरू केलेली ही शैक्षणिक चळवळ कोवीडच्या कठीण काळातही थांबली नाही. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन मार्गदर्शन, तर दुष्काळात शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत मार्गदर्शन करून त्यांनी हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. केवळ राजकारण नाही तर समाजहित जपणारा नेता कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व 4700 विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये याची काळजी संस्थेने घेतली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
