पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न!
येलदरी व सिद्धेश्वर धरणातून पाणी मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – आ. राजू भैया नवघरे
वसमत | प्रतिनिधी

वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ च्या ४६ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाचे आयोजन सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:११ वाजता कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष जयप्रकाश दांडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात करण्यात आले. यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कारखान्याचे सन्माननीय संचालक राजूभैया नवघरे, कारखान्याचे सन्माननीय संचालक चांदू माणिकराव इंगोले व त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई इंगोले यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
या कार्यक्रमात शेती व ऊसविकास उपसमितीचे अध्यक्ष शाहाजीराव देसाई यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्णा सहकारी साखर कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन केले. तसेच कारखान्याचे सन्माननीय संचालक हरिभाऊ शेलके यांनीही मनोगत व्यक्त करताना सभासद व शेतकऱ्यांनी आपला ऊस पूर्णा कारखान्याला देऊन सहकार्य करावे, अशी विनंती केली.
यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कारखान्याच्या प्रकल्पासाठी येलदरी व सिद्धेश्वर धरणातून एकूण ४० पाणी पाळ्या मिळाव्यात, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी पूर्णा सहकारी साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य केल्यास कारखान्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या समारंभास व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, प्रा. रामचंद्र बागल, कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील सभासद, शेतकरी, बंधू-भगिनी, तोडणी व वाहतूक ठेकेदार, कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कारखान्याचे कामगार प्रतिनिधी रघुनाथराव डाखोरे यांनी केले. बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यामुळे आगामी गळीत हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली असून, कारखान्याच्या यशस्वी वाटचालीसाठी शेतकरी व सभासदांच्या सहकार्यावर भर देण्यात आला.
