वाढदिवसाला केक कापण्याऐवजी थेट ‘प्रेतयात्रा’! प्रशांत लोखंडे यांच्या आंदोलनाने खळबळ
प्रशासनाच्या ‘कुंभकर्णी’ झोपेविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरोधात कल्पक आंदोलन!
वसमत प्रतिनिधी :
प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपे विरुद्ध व भ्रष्टाचाराच्या माखलेल्या अधिकारी व कंत्राटदारांना जा विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे यांनी प्रेत आंदोलन करून शासनाचा अनोख्या मार्गाने निषेध केला

उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथील पीएम रुम बांधकाम व इतर किरकोळ कामांसाठी मंजूर सुमारे ८० लाख रुपयांच्या निधीच्या खर्चाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रशांत लोखंडे थोरावेकर यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने प्रेत आंदोलन करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय परिसरात प्रत्यक्षात एकच पीएम रुमचे बांधकाम दिसून येत असताना मंजूर निधीतील उर्वरित लाखो रुपये नेमके कोणत्या कामावर आणि कशाप्रकारे खर्च करण्यात आले, याबाबत प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या संपूर्ण निधीच्या खर्चाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून कामाचे अंदाजपत्रक, प्रत्यक्ष काम, देयके व खर्चाचा तपशील तपासावा, अशी मागणी करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय वसमतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे यांनी रुग्णालयात असताना देखील निवेदन घेण्यास कारणे दाखवले तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोथीकर यांना आंदोलक कार्यालयात येत असल्याची भनक लागताच त्यांनी पळ काढला. यासंदर्भात अधिका-यांना पुर्वसुचना देऊन देखील लोकशाही पद्धतीने काढण्यात आलेल्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवमान केल्याचा आरोप आंदोलक सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे थोरावेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.
या प्रकरणी वारंवार प्रशासनाकडे निवेदने देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत जन्मदिनीच प्रेतयात्रा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. निधीच्या खर्चात तफावत आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई करून शासकीय निधीची वसुली करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दहा दिवसांत चौकशी पूर्ण करून कारवाई न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात पोलीस प्रशासनाने मोलाची भूमिका बजावत शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुधीर वाघ यांनी पोलीस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत केली सदर आंदोलन स्थळी पोलीस कर्मचारी अंबादास विभुते व नवनाथ अंभोरे यांना तैनात केले होते.आंदोलन शांततेत पार पडले.
यावेळी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते गिरीश देशमुख, नितीन वाघिले, बालाजी अडकिने आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला
