PDCC Bank Election: आ. राजूभैया नवघरेंची ‘जिल्हा बँके’त एन्ट्री; राजकीय हालचालींना वेग!
वसमत (विशेष प्रतिनिधी):
(PDCC) परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक रणधुमाळीला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आज वसमत येथे राजकीय हालचालींना वेग आला असून, वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांनी स्वतः सोसायटी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्याचप्रमाणे, वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन भोसले यांनी देखील ‘ओबीसी’ (इतर मागासवर्गीय) प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही महत्त्वाच्या अर्जांमुळे वसमत तालुक्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज वसमतमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महाविकास आघाडी व सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संस्थांचे संचालक, आजी-माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. या शक्तीप्रदर्शनामुळे या निवडणुकीत वसमत पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
