डोळेझाक की अभय? महसूल अन् पोलिसांच्या नाकाखाली माती माफियांचा उच्छाद!
वसमत/ तालुका प्रतिनिधी.
वसमत शहरात भल्या पहाटे परभणी कडुन येणारे मातीचे हायवा सर्व नियम धाब्यावर बसवुन वाहतुक करत असतांना रोजच दिसत आहेत. प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत असून किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे.
वरिष्ठांच्या आदेश देऊनही पोलीस व महसुल प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी हे माती माफिया च्या बाबतीत गांधारीची भूमिका घेत आहेत.
वसमत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध माती उत्खनन,गौण खनिज साठा आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अखेर नागरिक रस्त्यावर उतरले असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर “लाक्षणिक उपोषण व ढोल बजाव आंदोलन” छेडण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की,“वसमतमध्ये दिवसाढवळ्या माती माफियांचा धुमाकूळ सुरू असून प्रशासनाचे दुर्लक्ष त्यांना पाठीशी घालत आहे.”
निवेदनानुसार,तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर अवैध माती उत्खनन केले जात असून ती वीटभट्ट्यांवर साठवली जात आहे.रोज शेकडो हायवा आणि टिपरद्वारे वाहतूक सुरू असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,पण प्रशासन कारवाईऐवजी मौन बाळगत आहे,”असा संतप्त आरोप आंदोलनकर्ते गौतम मारोतराव दिपके व सुमेध श्रीरंग मस्के यांनी केला.त्यांच्या प्रमुख मागण्या अवैध माती वाहतूक तात्काळ बंद करावी.
वीटभट्ट्यांवरील साठवलेली माती जप्त करून भट्ट्या सील कराव्यात.
माती माफिया,वाहन मालक व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
कायमस्वरूपी तपासणी पथक नेमावे.
नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या हायवा-टिप्परवर कठोर कारवाई करावी.
“कारवाई नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू,”असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
