वसमत येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची बैठक संपन्न; पत्रकारांच्या विविध योजनांसाठी राज्यासह केंद्राकडे पाठपुरावा – चौरडिया
वसमत (जि हिंगोली ) :
येथील शासकीय विश्रामगृह येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आणि पत्रकार नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या बैठकीत संघटना बांधणीसह पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय चोरडिया म्हणाले की, “पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पत्रकारांच्या पाल्यांना एमपीएससी (MPSC) आणि यूपीएससी (UPSC) सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने मोफत कोचिंग क्लासेस आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.” तसेच, भविष्यात पत्रकारांच्या मुलांना नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी कशा प्रकारे सवलती व मदत मिळवून देता येईल, यावरही संघटनेकडून नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांचे विविध विषय, समस्या यांचा पाठपुरावा राज्यासह केंद्राकडे व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून चालू असल्याचे यावेळी चोरडिया यांनी सांगितले
या प्रसंगी संघटनेच्या विविध कल्याणकारी योजना व सवलतींविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला जिल्हा ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष संजय बर्दापुरे आणि शमीम सिद्दीकी यांनी उपस्थित राहून पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार बल्लाया स्वामी यांनी मानले. या बैठकीला वसमत शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
